President’s Message

Photo : President

आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री, थोर लोकनेते पद्मश्री मा. श्री. भाऊसाहेब वर्तक यांनी वसई-विरार परिसरातील विद्यार्थ्यांना कालानुरूप उच्च शिक्षण मिळावे या उदात्त हेतूने विद्यावर्धिनी शिक्षणसंस्थेची स्थापना केली. या कार्यात तत्कालीन राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात सक्षमपणे कार्य करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांची मोलाची साथ त्यांना लाभली. मा. भाऊसाहेबांनंतर संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महाराष्ट्र राज्याच्या माजी मंत्री श्रीमती तारामाई वर्तक यांच्याकडे आली. त्यांनी आपल्या कुशल नेतृत्वाने संस्थेला प्रगतीपथावर नेले. त्यांच्यानंतर अध्यक्ष झालेल्या मा. श्री. प्रतापभाई खोखाणी यांनी संस्थेच्या विकासात मोलाचे योगदान दिले व ते संस्थेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी सतत कार्यरत राहिले.

आज विद्यावर्धिनी एक दर्जेदार शिक्षणसंस्था म्हणून नावारूपाला आली आहे. तळागाळातील सर्वसामान्य विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून त्याला दर्जेदार शिक्षण देणे, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे हे या शिक्षणसंस्थेचे उद्दिष्ट आहे. बदलत्या काळानुसार विद्यावर्धिनी विविध अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्त्वावर अतिशय माफक शिक्षणशुल्कात उपलब्ध करून देत आहे. आमच्या शिक्षणसंस्थेत मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण अधिक आहे ही एक अभिमानास्पद बाब म्हणता येईल. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक, क्रीडा आणि वाङ्मय या क्षेत्रांतही आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवला आहे. अशाप्रकारे विविध शैक्षणिक व सामाजिक उद्दिष्ट्ये साध्य करत ही शिक्षणसंस्था आपल्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. लोकनेते पद्मश्री मा. भाऊसाहेब वर्तक यांनी आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणेच यानंतरच्या काळातही आमची शिक्षणसंस्था विद्यार्थांना सर्वोत्तम शिक्षण देऊन त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहील, हे निश्चित!

श्री. विकास नरसिंह वर्तक
(अध्यक्ष, विद्यावर्धिनी शिक्षणसंस्था)